नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ वर्ध्यात युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Fri 12-Jun-2026,09:50 PM IST -07:00
Beach Activities

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ वर्ध्यात युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

प्रदेश उपाध्यक्ष कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

देशभरात चर्चेत असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सायंकाळी शहरात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात युवक काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नागपूर विभागीय प्रभारी कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. ठाकरे मार्केट परिसरातून सुरू झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. हातात मशाली व निषेधाचे फलक घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “नीट घोटाळ्याची चौकशी करा” आणि “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी वक्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरण हे देशातील शिक्षण व्यवस्थेवरील गंभीर संकट असल्याचे सांगितले. लाखो विद्यार्थी कठोर परिश्रम करून परीक्षेची तयारी करतात; मात्र अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

प्रदेश उपाध्यक्ष कपिल ढोके यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली. “नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास डळमळीत झाला असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा,” असे ते म्हणाले.

मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखण्याची मागणी केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणे थांबवावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी सागर चव्हाण, सहप्रभारी आयुषी देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शेखर शेंडे, महिला जिल्हाध्यक्ष अरुणा धोटे, प्रदेश सचिव अफझल बेरा, अंकुश मुंजेवार, एनएसयूआय अध्यक्ष विश्वभूषण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच राहुल सुरकार, अंकित हिवरे, अमित ददगल, प्रतीक सूर्यवंशी, अमोल उघडे, प्रीतम हिंवज, शिवराज शिंदे, अंशुल भोसले, हिमांशू ठाकरे, आयुष ढोमणे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.